कार अपघाताने उघडले काळविटाच्या मांसाचे गूढ !

Foto
चार जणांवर कारवाई; धुळे-सोलापूर महामार्गावरील अपघात
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : धुळे-सोलापूर महामार्गावर भरधाव कारचा अपघात झाल्यानंतर करण्यात आलेल्या पोलिस तपासणीत कारमध्ये काळविटाचे मांस आढळून आल्याने खळबळ उडाली. अपघाताच्या घटनेचा तपास करताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सातारा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे-सोलापूर महामार्गावर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास भरधाव कारचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त कारची पाहणी केली असता वाहनाच्या मागील बाजूस काळविटाच्या मांसाचे तुकडे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. कारची अधिक तपासणी केली असता काळविटाच्या शिकारीनंतर त्याचे मांस वाहतूक केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.
अपघातग्रस्त कारमध्ये चार जण प्रवास करीत होते. सोलापूरहून धुळ्याच्या दिशेने जात असताना कारचा अपघात झाला.
अजामीनपात्र गुन्ह्याखाली कारवाई
हा गुन्हा गंभीर, अजामिनपात्र आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातात जखमी झालेले व पसार झालेले आरोपी सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत असण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती मिळवून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.
कार उलटल्याने त्यातील प्रवाशांना दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षकांसह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कारची तपासणी करताना काळविटाचे मांस
मिळाल्याने अपघाताचे स्वरूप अधिक गंभीर झाले. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर त्याबाबत अधिकृत निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.
कारचा वापर शिकारीसाठी ?
अपघातग्रस्त कार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एका व्यक्तीच्या नावावर आहे. काही महिन्यांपूर्वीच आरोपी मुस्तफा याने ही कार त्याच्याकडून खरेदी केली. या वाहनाचा वापर वन्यजीवांची शिकार आणि तस्करीसाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions